अपघात प्रकरणातील पीडित कुटुंबाला लोकअदालतचा दिलासा; तब्बल एक कोटीची नुकसानभरपाई
कराड : कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघात प्रकरणात लोकअदालतच्या माध्यमातून ऐतिहासिक तडजोड साध्य होत, पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दोन्ही पक्षकारांमध्ये परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्यपूर्ण चर्चेनंतर ही तडजोड पूर्ण झाली असून, लोकन्यायालयाने त्यावर आपल्या निर्णयाची मोहोर उमटविली.
या भरीव विमा रकमेच्या मंजुरीमुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयात खऱ्या अर्थाने न्याय मिळतो, याचा आज अनुभव आला, अशी भावना पीडित अर्जदाराने व्यक्त केली. एकाच प्रकरणात १ कोटी रुपयांची अपघात भरपाई मंजूर होणे ही घटना कराड लोकन्यायालयाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली असून, लोकन्यायालयाच्या प्रभावी भूमिकेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अपघातामुळे अर्जदार व त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक स्वरूपाचे मोठे नुकसान सहन करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर लोकन्यायालयाने प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करत, दोन्ही बाजूंच्या संमतीने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली. त्यानुसार संबंधित विमा कंपनी व जबाबदार पक्षाकडून पीडित अर्जदारास एक कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली.
दरम्यान, हा निकाल मोटार अपघात दाव्यांबाबत लोकन्यायालय हे वेगवान, परिणामकारक व न्याय्य पर्याय ठरू शकते, याचे ठोस उदाहरण मानले जात आहे. या निर्णयाचे कायदेशीर व सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, भविष्यात अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयाचा अधिकाधिक वापर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ॲड. गोवेकर यांनी बजावली मध्यस्थींची भूमिका
या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी व डी.बी. पतंगे, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.एस.बी. गोवेकर यांनी प्रभावी मध्यस्थींची भूमिका बजावली. अर्जदारांच्या वतीने ॲड. निरज फिरंगे, ॲड. अजिंक्य डुबल, ॲड. मच्छिंद्र पवार, ॲड. यशवंतदत्त बेंद्रे व ॲड. ऋषिकेश यादव यांनी बाजू मांडली, तर विमा कंपनीकडून ॲड.एस.एस. फडतरे यांनी काम पाहिले.
संवेदनशील न्यायदानाचा अनुभव
यावेळी संबंधित कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले. संपूर्ण वातावरण भावूक झाले होते. जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी स्वतः पुढाकार घेत कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यापुढील आयुष्य सकारात्मकतेने व धैर्याने जगा, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. न्यायदान करताना नेहमी गंभीर व कठोर भासणाऱ्या जिल्हा न्यायाधीशांचे हे संवेदनशील रूप उपस्थितांच्या मनाला भावून गेले.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल






