संग्रहित फोटो
पुणे : विधानसभा निवडणुकीत बंडखाेरी करणाऱ्या तीन उमेदवारांवर काॅंग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. या तिघांना नाेटीस बजाविण्यात आली आहे. २४ तासांत उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा या नाेटीसद्वारे दिला आहे. पुण्यात काॅंग्रेसमध्ये झालेली बंडखाेरी महाविकास आघाडीची डाेकेदुखी ठरली आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून मनिष आनंद यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय बहिरट यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. कसबा पेठ मतदारसंघातून कमल व्यवहारे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली. तर पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोधात आबा बागूल यांनी बंडखोरी केली. या तिघांना शहर काॅंग्रेसकडून नाेटीस पाठविल्याची माहीती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आजपासून सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांना नाेटीसद्वारे केली आहे. त्यांनी तसे केले नाही, तर त्यांच्याविरुद्ध पक्षाची शिस्तभंग केल्याची कारवाई केली जाणार आहे. मनिष आनंद यांच्या पत्नी शहर महीला काॅंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांनादेखील त्यांची बाजू मांडण्याची संधी पक्षाने दिली. त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी व्हावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्याकडे असलेले पद काढून घेतली जाईल.
इतर पक्षात प्रवेश नाही
महाविकास आघाडीमध्ये काॅंग्रेस , शरद पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस, ठाकरे यांची शिवसेना हे प्रमुख पक्षासह इतर काही पक्षांचा समावेश आहे. बंडखाेर उमेदवारांवर कारवाई झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या इतर पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
काॅंग्रेसमधील गटबाजीमुळे बंडखाेरी
शहर काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे बंडखाेरीला प्राेत्साहन मिळाल्याची चर्चा आहे. स्थानिक नेत्यांसह प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या विनंतीला ही या बंडखाेरांनी जुमानले नाही. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीनंतर शहर काॅंग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाला हाेता. परंतु त्याचवेळी शहराध्यक्ष पदावरून सुरु झालेले पक्षातंर्गत राजकारण तापत गेले. यातूनच निर्माण झालेल्या गटबाजीचा फटका हा पक्षाला निवडणुकीत बसु शकतो.
हे सुद्धा वाचा : राज्यात प्रचाराचा धुराळा; आजी- माजी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरात घोषणांचा पाऊस
राहुल गांधींचं नागपुरात संविधान संमेलन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.