सौजन्य - नवराष्ट्र टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यभर झंझावाती प्रचार सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यात प्रचार सभा घेऊन त्यांनी पुणे व ठाण्यात पदयात्रा व रॅलीमध्ये सहभाग घेतला तसेच प्रचार सभाही घेतल्या. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे असा आरोप अजित पवार करत आहेत तर भाजपा अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर विचारले असता अजित पवार जय जिनेंद्र व जय जैन बोर्डिंग म्हणतात. सरड्यालाही लाजवेल असे रंग हे लोक बदलत आहेत. सत्तेत राहुन एकमेकावर आरोप करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे अन्यथा भाजपाने अजित पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाकारावा. पण ते तसे करणार नाहीत. दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपा शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात नैतिकता राहिलेली नाही.
सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे शहराला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा व वारसा लाभलेला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख होती पण आता पुण्यात ड्रग्जचा काळा धंदा, कोयता गँग, भ्रष्ट व पायाभुत सुविधांचा बोजवारा उडालेले शहर अशी ओळख बनली आहे. आता पुणेकरांनीच आपला पुणेरी बाणा जपला पाहिजे, असे अवाहन सपकाळ यांनी केले आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे, त्यांना पक्षात कोणीही चालते. गुंड, मवाली यांना तर त्यांनी पक्षात सामावून घेतलेच आहे आता त्यांनी बलात्काऱ्यांनाही पक्षात सामावून घेतले आहे, असे सपकाळ म्हणाले.






