हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये दाणादाण उडवली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. भूमिगत मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईच्या नालेसफाईवरून सरकारवर टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या कार्यकाळापासून राज्याच्या नगर विकास विभागाचे मंत्री राहिलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री देखील सातत्याने मुंबईच्या प्रशासनामध्ये सातत्याने ढवळाढवळ करत असतात.”
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सरकारमधील या सर्वांनी मिळून जो गोंधळ घातलेला आहे, जो भ्रष्टाचार केलेला आहे. कालच्या पावसात मुंबई तुंबली हे त्याचे परिणाम आहेत. जी गटारगंगा काल बघायला मिळाली ही सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा होती. भूमिगत मेट्रोचा प्रकल्प जो आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजहट्ट आहे. या ठिकाणी भूमिगत मेट्रो होवू शकत नाही असं त्यांचाचं विभाग सांगतो.”
मुंबईची तुंबई झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला असून तुफान पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. लोकल सेवा ठप्प झाली असून रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. तसेच मेट्रो-3 प्रकल्पाला मोठा फटका बसला असून मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. तळांमध्ये उतरल्याप्रमाणे प्रवासी मेट्रो स्थानकांवर उतरत आहेत. या परिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी करुन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून जनतेला आवाहन केले आहे.
Mumbai Rain : “पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे…; मुंबईची तुंबई झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “कंट्रोल रुममधून सर्व स्पॉट पाहिले आहेत. मिलन सबवे, हिंदमाता, अंधेरी, सायन येथील पाणी ओसरलं आहे. तिथे पंपाची व्यवस्था केली आहे. पाऊस जूनच्या 10 तारखेपर्यंत येतो. तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला. नरीमन पॉइंटला 252 मीमी पाऊस पडला. महापालिका मुख्यालयात 294 मीमी पडला. 50-50 मीमी पावसाची अपेक्षा असलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडला. त्यामुळे ढगफुटीसारखं झालं, पण आता सर्व सुरळीत झाले आहे. वाहतूक सुरळीत झाली,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.