सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : भोर-वेल्हा-मुळशी या विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी कॉंंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे शनिवारी पाठवून दिला आहे. यासंदर्भात त्यांचा मेल आला असल्याच्या वृत्ताला सपकाळ यांनीही दुजोरा दिला आहे. नवराष्ट्र आणि नवभारत कार्यालयास सपकाळ यांनी भेट दिली असता, यावेळी संवाद साधताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्याच वेळी त्यांनी थोपटे यांचे घराणे हे कॉंंग्रेस निष्ठावंतांचे घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वडीलांचे महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी कॉंंग्रेस सोडू नये असे मी त्यांना आवाहन केले असल्याचेही सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा काळ कॉंग्रेससाठी संघर्षाचा काळ आहे. या काळात वाट बघण्याची मानसिकता काही जणांची नाही. त्यामुळे काही लोक पक्ष सोडून जात आहेत. मुळातचं काही लोक संधी साधू आहेत. असंही सपकाळ म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी कॉंंग्रेसला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हातात घेतले होते. महिनाभराच्या अंतरातच आता संग्राम थोपटे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कॉंंग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.
संग्राम थोपटे कॉंंग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपाच्या गोटात जाणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून फिरत होते. थोपटे यांनी या वृत्ताचा पहिल्यांदा इन्कार केला असला तरी, काही दिवसांत आपली भूमिका जाहीर करू, असे सांगितल्याने थोपटे कॉंंग्रेस सोडणार असल्याचे जवळपास नक्की मानले जात होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी कॉंंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या (रविवारी) थोपटे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला असून, या मेळाव्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
कॉंंग्रेस पक्षाशी चाळीस वार्षांपासून निष्ठावान म्हणून थोपटे कुटुंबाकडे पाहिले जात होते. विलासराव देशमुख, बॅ. अंतुले, विलासकाका, प्रतापराव या वसंतदादा पाटील यांच्या समर्थक गटातील महत्त्वाचे सहकारी म्हणून महाराष्ट्रात अनंतराव थोपटे यांना ओळखले जात होते. कट्टर कॉंंग्रेसी असलेल्या अनंतरावांप्रमाणेच संग्राम थोपटे हे देखील कॉंंगेस पक्षाचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र महाआघाडीच्या काळात तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.