कल्याण : कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी श्रमिक जनता संघ कल्याण युनिटच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. डिसेंबर 2023 पासूनचे थकीत वेतन ताबडतोब अदा करण्यात यावे. ठेकेदाराने प्रत्येक कामगारांना दरमहा हजेरी कार्ड द्यावे व हजेरी कार्डवर रोज हजेरी लावून हजेरी घेणारे संबंधित अधिकारी यांनी स्वाक्षरी करावी. कामगारांना ओळखपत्र द्यावे, गणवेश व सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे.
सर्व कामगारांची फेब्रुवारी 2015 पासूनची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम (सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे सहाऐंशी रुपये रक्कम) ताबडतोब अदा करण्यात यावी. वयोमानानुसार निवृत्त केलेल्या कामगारांची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. या व इतर न्याय मागण्यांसाठी श्रमिक जनता संघ कल्याण युनिटच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर धडक देत निषेध मोर्चा काढला. यावेळी या कामगारांनी मुख्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.