कर्करोगावरील लस महाराष्ट्रातही उपलब्ध होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
जगभरात कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. या आजारावर आतापर्यंत कोणतीही लस किंवा औषधं उपलब्ध नव्हती मात्र आत त्यावर लस येणार आहेु. ती भारतात आणि महाराष्ट्राला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केल जात होता, त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांन मोठी घोषणा केली आहे. बालकांचे आरोग्य हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसते तर ते समाजासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तितकेच महत्त्वाचे असते. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. या आजारावर लस आली आहे. ही लस राज्यातील महिला आणि मुलींना कशी देता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बदललेली जीवनपद्धती, कामाचा वाढता व्याप यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची संपूर्ण आरोग्य तपासणी दरवर्षी करून घेतली पाहिजे. यामुळे आजाराची लक्षणे समजून येतात आणि त्यावर उपचार घेणे सोपे जाते. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर एक नवीन लस आल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ही लस राज्यातील महिला आणि मुलींना कशी देता येईल याबाबत महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत १८ वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत ६ हजार शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३० हजार अंगणवाडीतील २० लाख बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सुमारे दोन कोटी महिलांची आरोग्यविषयक तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारचे उपचार करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सुमारे दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाचेही लोकार्पण करून नागरिकांना अधिकाधिक आरोग्यविषयक सेवा देण्याचे काम सुरू आहे. ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी मिळून काटेकोरपणे नियोजन करावे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी आभार मानले.