डीसीएम अजित पवारांच्या हस्ते वडगाव मावळ मधील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे लोकापर्ण आणि भूमिपूजन होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Ajit Pawar Pune: वडगाव मावळ: सतिश गाडे: मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता तळेगाव येथे उघडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण सोहळे पार पडणार आहेत, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
या भव्य सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार रुपलेखा ढोरे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, रमेश साळवे, सूर्यकांत वाघमारे, गणेश खांडगे, अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, यादवेंद्र खळदे आणि श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे आदी मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याला लाभणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
७७ कोटींच्या लोकार्पण कामांचा शुभारंभ
या कार्यक्रमात ७७ कोटी ५४ लाख रुपयांच्या लोकार्पण कामांसह ६८३ कोटी ६३ लाख रुपयांच्या भूमिपूजन प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. लोकार्पण होणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे. यामध्ये ४० कोटी रुपयांची तळेगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. त्याचबरोबर १.७१ कोटी रुपयांचे श्री शिवशंभू स्मारक तीर्थ देखील निर्माण केले गेले आहे. याचबरोबर १०.९३ कोटी रुपयांचे लोणावळा शहरी व ग्रामीण पोलीस स्टेशन, १४.१५ कोटी रुपयांचे गहुंजे-साळुंब्रे पूल आणि १०.७५ कोटी रुपयांची वडेश्वर आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन देखील केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तब्बल ६८३ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. सोहळ्यात भूमिपूजन होणाऱ्या प्रमुख प्रकल्पांमध्ये – कुरवंडे लायन्स–टायगर पॉइंट रस्ता हा १८४ कोटी रुपयांचा प्रकल्प असणार आहे. त्याचबरोबर १२५ कोटी रुपयांचे देहू–येलवाडी रस्ता कॉक्रीटीकरण, ४२.७० कोटी रुपयांचे कार्ला चाणक्य एक्सलन्स सेंटर, ४० कोटी रुपयांचे वडगाव पाणीपुरवठा योजना, ३८ कोटींचा तिकोना–तुंग–राजमाची किल्ले रस्ते आणि त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना व PMRDA अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉक्रीटीकरण कामांचे भूमीपूजन केले जाणार आहे.
विकासयात्रेला नवा वेग
या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यामुळे मावळ तालुक्याच्या विकासयात्रेला नवा वेग मिळणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून साकारलेले हे प्रकल्प भविष्यातील मावळकरांच्या जनसेवेचे केंद्र आणि अभिमानाचे प्रतीक ठरणार आहेत.