फोटो सौजन्य; iStock
11 वर्षीय ग्रंथ मुथा या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मिरा-भाईंदरमध्ये संतापाची लाट उसळली असून, न्याय मिळावा यासाठी रविवारी एक भव्य रॅली काढण्यात आली.
ही न्याय रॅली भाईंदर पश्चिमेतील 60 फूट रोडवर स्थित अहिंसा चौक येथून सुरू झाली. रॅलीमध्ये 500 हून अधिक कुटुंबीय, शाळकरी मुले, जैन समाजाचे नागरिक, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते तसेच आजी-माजी आमदार यांनी सहभाग घेतला. सर्वांच्या हातात “ग्रंथ मुथाला न्याय मिळवून द्या” अशा आशयाचे फलक होते. विशेषतः ग्रंथचा मोठा भाऊ त्याचा फोटो घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाला होता, ज्यामुळे वातावरण अधिक भावुक झाले.
स्थानिक रेल्वे प्रशासनाचा हा कोणता प्रकार? असे म्हणत नेरळच्या नागरिकांचे ‘या’ समस्येवर भाष्य
20 एप्रिल रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलामधील जलतरण तलावात ग्रंथचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेत नवघर पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, कुटुंबियांचा आरोप आहे की पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रॅलीचा शेवट नवघर पोलीस ठाण्यावर झाला, जिथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांपुढे आपला रोष व्यक्त केला आणि या प्रकरणात निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी केली.
ग्रंथचे वडील म्हणाले, “या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत आहे. आम्हाला न्याय मिळावा यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत.”
तर मग हजसाठी…Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या ‘या’ धाडसी भूमिकेची होतेय चर्चा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले, “पीडित कुटुंबीयांकडून काही सूचना आणि तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अधिक तपासून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.”
ग्रंथ मुथाच्या मृत्यूनंतर उडालेली ही प्रतिक्रिया केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. आता सगळ्यांच्या नजरा पोलिसांच्या पुढील पावलांकडे लागलेल्या आहेत.