Dehuraod Road Are In Bad Conditions Pune News Update
Pune Road Conditions : एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार का? देहूरोडच्या त्रस्त नागरिकांचा सवाल
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौकामध्ये मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
देहूरोड येथील शिवाजी विद्यायलाजवळील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
देहूगाव : पुण्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून यामुळे अनेकदा मोठे अपघात होताना दिसून येतात. देहूरोडवरील अशा प्रकारे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौक हा वर्दळीचा चौक आहे. या मुख्य चौकाच्या मध्यभागीच मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे देहूकरांकडून रोष व्यक्त केला जात असून वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
देहूरोडवरील शिवाजी विद्यालयजवळील या चौकामध्ये झालेल्या मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे गाळ मिश्रित पाणी साठले जाते. याच ठिकाणी पाण्याची पाईप लाईन अथवा गटारांची पाईप लाईन फुटली असत्यामुळे देखील सतत या भागात पाणी साचून गाळ मिश्रित चिखल निर्माण होत आहे. वाहन चालक, सायकलवरून प्रवास करणारे विध्यार्थी, विद्यार्थिनी, वाहन चालक आणि पादचारी जाणाऱ्यांना या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत.अनेकजण जखमी झाले असून वाहने घसरुन अपघात होत आहेत. तर मामुर्डी, शीतळानगर कडून तसेच देहूरोड कडून पुणे बेंगलोर जुन्या महामार्गावर जाऊन मार्गाकडे जाणारी ,तसेच या महामार्गावरून देहूरोड शहर किंवा शीतळानगर, मामुर्डीकडे जाणारी वाहने शिवाजी विद्यालयाजवळी या खड्डे असलेल्या चौकात येतात.
त्या ठिकाणी खड्डे असल्याने वाहने मागे पुढे करून वाहनचालकांना कसरत करुन वाहने बाहेर काढावी लागतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने किरकोळ शाब्दिक वाद आणि शिवीगाळ होत आहे. अनेकदा संतप्त वाहनचालकांमध्ये हाणामाऱ्या होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. यामुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत असून वाहन चालकांची चिडचिड होत आहे. खड्डे वाचवणे अशक्य गोष्ट झाली आहे. खड्ड्यात गाड्या घातल्या शिवाय दुसरा पर्यायच नाही.
देहूरोडमध्ये या ठिकाणी मोठे मोठे पडलेले खड्डे बुजवणे किंवा या ठिकाणी डांबरीकरण करावे, याबाबत कॅन्टोमेंट बोर्डाच्या मुख्याधिकारी,अधिकारी हे उदासीन असून ते बोर्डाच्या कार्यालयात किंवा पंख्याची हवा खात बसत आहेत. त्यांना देहूरोडमधील नागरी समस्यांचे काही घेणं देणं नाही. या ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड जागे होणार आहे का? असा प्रश्न त्रस्त झालेले देहूरोडचे ग्रामस्थ,वाहन चालक उपस्थित करू लागले आहेत. या ठिकाणी जर कोणाचा नाहक बळी गेला तर कॅन्टोमेंट बोर्डाला जबाबदार धरून मुख्याधिकारी , संबधित अधिकारी यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी देहूरोड देहूरोड शहर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत.
Web Title: Dehuraod road are in bad conditions pune news update