संग्रहित फोटो
बारामती : माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले. मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत? असा उपरोधिक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगाव कारखान्याला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. शिरवली (ता. बारामती ) येथे माळेगांव कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून आमच्यावर खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत. कारखान्यावर कर्ज नाही, माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला हे सभासदांना माहीत आहे. विरोधकांच्या कार्यकाळात साखर उत्पादन कमी झाले. इथेनॉल कमी भावात विकले. पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले याला जबाबदार कोण? असा सवाल करत माझ्यावर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे. सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते.
ज्या गावात जादा मतदान होईल त्या गावात स्विकृत संचालक, नोकर भरतीत प्राधान्य देऊ. सिंगल मतदान करु नका. कारखान्याच्या संचालकांना गाडी वापरता येणार नाही. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल. कारखान्याचा एकही पैसा न घेता सीएसआर फंडातून काम केले जाईल.