मुंबई – राज्यातील सत्तांतर काही एका रात्रीतून घडले नाही. मागील दीड वर्षांपासून त्याची पटकथा लिहिली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः विधानसभेत याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. “देवेंद्र रात्रीच्या वेळी वेशांतर करून घराबाहेर पडायचे. ते चष्मा व हुडी घालून जात असत. त्यामुळे बऱ्याचदा मलाही ते ओळखायला येत नव्हते. मी त्यांना ‘तुमचे काय सुरू आहे’ असे विचारले तर ते कोणतेही उत्तर न देता काढता पाय घ्यायचे,” असे अमृता यांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी अमृता फडणवीस यांनी वार्तालाप केला. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतरासोबतच, भाजप परत सत्तेत येण्याची शक्यता वाटत होती असे म्हटले.
अमृता फडणवीसांनी म्हणाल्या, मला देवेंद्र यांच्याकडून एक अपेक्षा होती की, त्यांनी सेवा करावी. ते कोणत्याही पदावर असले तरीही ते सेवा करीत आहेत. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. अशा प्रकारे ते येतील असे मला वाटत होते.
अमृता म्हणाल्या, राज्याची स्थिती कोलमडणे, इगो राईट्स, लोकांची घरे तोडणे, हनूमान चालिसा, लोकांच्या समस्या, एसटी कर्मचारी असो की ओबीसी आरक्षण आदी विविध कारणे असो त्यामुळे मलाही भाजपची सत्ता परत येणार हे वाटतच होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ते येतील असे सर्वांनाच वाटत होते, पण ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावर अमृता म्हणाल्या की, मला थोडे आधीपासून समजले होते की, देवेंद्र मुख्यमंत्री होणार नाही. त्याशिवाय ते कोणतेही पद स्वीकारणार नाही हेही मला माहित होते.
अमृता म्हणाल्या, मला गर्वही वाटत होता की, एकनाथ शिंदे यांना जेही ओळखतात ते चोवीस तास अविरत काम करतात. ते सुद्धा देवेंद्र यांच्यासारखेच सेवक आहेत. त्यामुळे दोघे पदावर असो की नसो ते एकत्रित खूप चांगले काम करणार आहे याची शाश्वती होती त्यामुळे देवेंद्र कोणते पद घेत आहेत अथवा नाही याचा काहीही फरक पडणार नव्हता.