ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा! ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे. जमीन नोंदी, शेत रस्ते, विविध प्रमाणपत्रे, तक्रारींचे निराकरण अशा अनेक बाबींमध्ये नागरिकांना या विभागाशी सतत संपर्क असतो. ई-गव्हर्नन्समुळे सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचत आहे.
धाराशिव जिल्ह्यात विकसित करण्यात आलेल्या डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणालीमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे. यामुळे महसूल प्रशासनाला योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करता येत आहे. निर्णय प्रक्रियेला वेग मिळाल्याने नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना शक्य होत आहेत. कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली ही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. शासन निर्णय, परिपत्रके आणि कायदे यांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने कामकाज अधिक अचूक आणि सुसंगत झाले आहे. यामुळे निर्णय घेताना होणाऱ्या त्रुटी कमी होऊन प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे.
ग्रामीण भागाशी थेट संबंध असलेली जीवनरेखा प्रणाली, डिजिटल परिवर्तनाची महत्त्वाची कडी ठरली आहे. गट नंबर व सर्वे नंबरनिहाय शेत रस्त्यांची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण शक्य झाले आहे. परिणामी शेती उत्पादन, वाहतूक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महसूल विभागाच्या कामकाजात यामुळे अधिक सुसूत्रता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.
तुळजाई चॅटबॉटमुळे ग्रामीण नागरिकांना विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे. संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या सेवांची माहिती काही क्षणांत मिळत असल्याने नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे.
ई-ऑफिस प्रणालीमुळे पेपरलेस कार्यालय संकल्पना प्रत्यक्षात येत असून संचिकांची हालचाल वेगवान झाली आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि वेळेत पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब न होता सेवा वितरण अधिक विश्वासार्ह बनले आहे.
या सर्व उपक्रमांच्या यशामागे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. जिल्हाधिकारी पुजार यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर वाढवून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
एकूणच, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून, भविष्यातील सुशासनाचा मजबूत पाया म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.






