धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याला मागच्या आणि चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी सढळ हस्ते दिला आहे. मात्र या कोट्यावधीच्या निधीचा कागदी मेळ घालत येथील प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आमदार धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे १७ नोव्हेंबरला केली आहे.
पाझर तलाव, पाझर तलाव दुरुस्ती, पाझर तलावातील सीओटी, नवीन सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या सिमेंट बंधाऱ्यांचे नूतनीकरण करणे आदी कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून आगाऊ ३५ टक्के रक्कम कामे दिली असल्याचा आरोप आमदार धस यांनी प्रभारी जलसंधारण अधिकारी महामुनी यांच्यावर केला आहे. ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच या ठेकेदारांना कामांची देयके अदा केल्याचेही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यातील कांही कामे न करताच त्यांचा कागदोपत्री मेळ घालत त्या कामांच्या रकमा उचलण्यात आल्या आहेत. या विभागाने बांधलेले सिमेंट बंधारे कृषी विभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या तिप्पट रक्कम वापरून बांधले आहेत. मात्र या कामांचा दर्जा कृषी विभागाने बांधलेल्या बंधाऱ्याच्या ५० टक्केही नसल्याचा त्यांचा आरोप आहे. याच तिप्पट प्रमाणात वाढविल्या रकमेतून ३५ ते ४० टक्के रक्कम ठेकेदाराकडून संबंधित अधिकाऱ्याने घेतली असून जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती न करताच १० टक्के किरकोळ काम करून शंभरटक्के रकमा उचलण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारचा भ्रष्टाचार या निर्ढावलेल्या प्रभारी अधिकाऱ्याने सिमेंट नाला बांध दुरुस्ती, गाव तलाव, ओघळ उपचार आणि इतर उपचारांच्या कामात केल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी कृषी व पाटबंधारे विभागातील तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांकडून करावी अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यांनी तक्रार करून जवळपास एक महिना होत आहे. मात्र त्यांच्या या तक्रारींवरून चौकशी होत असल्याचे अद्याप दिसून येत नाही. सध्या नागपूर मुक्कामी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी या भ्रष्टाचार प्रकरणावर आवाज उठण्याची दाट शक्यता असून सरकारला धारेवर धरण्यास विरोधी आमदार सज्ज असल्याची खात्रीलायक माहिती आहे.






