‘साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम’; नवोदित साहित्य संमेलनात कैलास घाडगे पाटील यांचे प्रतिपादन
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : साहित्य हे समाजाला दिशा देणारे आणि परिवर्तन घडविणारे प्रभावी माध्यम असून नवोदित साहित्यिकांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही मोठी सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार तथा ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्य आणि समाज यांच्यातील नातेसंबंध अधोरेखित करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
आमदार पाटील म्हणाले की, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव मांडणारे आणि जनमानसाला विचारप्रवृत्त करणारे माध्यम आहे. नवोदित लेखक, कवी आणि साहित्यिकांना योग्य संधी मिळाल्यास मराठी साहित्य अधिक समृद्ध होईल. त्यामुळे अशा संमेलनांच्या माध्यमातून नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
साहित्यिकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देताना त्यांनी साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या नावाने ‘शेती आणि माती साहित्य पुरस्कार’ सुरू करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली. ग्रामीण जीवन, शेती संस्कृती आणि मातीतल्या वास्तवाचे प्रभावी चित्रण करणाऱ्या साहित्यिकांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करता येईल, असे त्यांनी नमूद केले. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास विविध साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यिक चर्चासत्रे, पुरस्कार वितरण आणि ग्रंथ प्रकाशन अशा विविध उपक्रमांमुळे संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.






