‘सामान्य जनतेची लूट बंद करा’; इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
मागील ११ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत तब्बल ८ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली असून ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किमतीत सुमारे ३८ टक्के तर डिझेलच्या किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ झाल्याने नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी, महिला, छोटे व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. तरीदेखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही देशात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या घरात पोहोचल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. ही बाब केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची साक्ष असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर व उत्पादन शुल्काच्या माध्यमातून तब्बल ४३ लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अलीकडील दरवाढीनंतर तेल कंपन्यांनी काही तासांतच हजारो कोटी रुपयांची कमाई केल्याचा आरोपही करण्यात आला. ही नफेखोरी म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर टाकलेला आर्थिक दरोडा असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. उत्पन्न स्थिर असताना महागाई वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डिझेल तुटवड्यामुळे राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पुरवठा विस्कळीत झाला असून शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. ट्रॅक्टर, पंप आणि शेती मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर,खलील सय्यद, प्रशांत पाटील, शहाजी मुंडे, उस्मान कुरेशी, संग्राम मुंडे, अशोक बनसोडे, गोरोबा झेंडे, मिलिंद गोवर्धन, शौकत मौलाना, वसंत मडके, दादासाहेब गायकवाड, संजय सरवदे, शिवाजी गायकवाड, अभिषेक बागल, धनंजय राऊत, सचिन गुरव, अंकुश पेठे, चंद्रकांत जाधव, आयुबखाँ पठाण, अचितराव घोगरे, ॲड. मुशरफ, अर्जुन बिराजदार, नाना भोसले, मधुकर यादव, विजय वाघमारे, अमित रेड्डी, मधुकर बिद्री, संग्राम पाटील, अप्पासाहेब शेळके, रोहन निरफळ, विलास शाळू, मोईज शेख, समी काझी, भीमा देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब गपाट, दिलीप क्षीरसागर, अमर तागडे व अजय खरसडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






