परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (फोटो- सोशल मिडिया)
समन्वयातून कामे पूर्ण करण्याचे सरनाईक यांचे निर्देश
श्रीक्षेत्र तुळजापूरच्या विकासावर बैठकीत दिला गेला भर
संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देत त्यांची निश्चित कालमर्यादेत पूर्तता करण्यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला स्पष्ट दिशा दिली आहे. मंत्रालयात ८ जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, ऊर्जा, शिक्षण, ग्रामविकास आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत सर्वाधिक भर श्रीक्षेत्र तुळजापूरच्या विकासावर देण्यात आला. येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, निधीची उपलब्धता आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मूर्ती प्रकल्पाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी कामे आणि पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. तसेच पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील गड-किल्ल्यांच्या संवर्धन व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
सामाजिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांनाही प्राधान्य
बैठकीत मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करणे, तुळजापूर येथे आधुनिक प्राणी संग्रहालय उभारणे, जनावरांसाठी आधुनिक स्मशानभूमी विकसित करणे तसेच धर्मवीर आनंद दिघे थीम पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही चर्चा झाली. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
साडेसांगवी पुलासाठी सकारात्मक संकेत
भूम तालुक्यातील मौजे साडेसांगवी येथील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक निधीबाबत ग्रामविकास विभाग लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. हा पूल उभारल्यास परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होऊन वाहतूक सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.
धाराशिवच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ची संधी
बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम. धाराशिव जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांची अमेरिकेतील ‘नासा’ अभ्यासदौऱ्यासाठी १५ ऑगस्टपूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कामात विलंब खपवून घेतला जाणार नाही’
प्रत्येक विभागाने आपल्या कामांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा विलंब होऊ नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुरातत्त्व विभाग, नगरपरिषद, पशुसंवर्धन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.






