संग्रहित फोटो
तासगाव / मिलिंद पोळ : आगामी जिल्हा परिषद (Tasgaon Zilla Parishad) व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील सात गट आणि १४ गणांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर अनेक गट आणि गणातून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला. तर काही गट आणि गणांमध्ये इच्छुकांसाठी ‘फिल गुड’चे वातावरण तयार झाले. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात सर्व राजकीय पक्षांसाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ असेच चित्र पाहायला मिळत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आणि पंचायत समिती गणातील अनेकांच्या राजकीय मक्तेदारीला चाप बसणार आहे. सर्वच इच्छुकांना नवीन सारीपाट मांडावा लागणार आहे. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात नवीन राजकीय पट तयार होणार आहेत. सर्वच इच्छुकांनी कालपासूनच त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सातपैकी चार गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर दोन गट हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आणि एक गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी पाच गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, चार गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर एक गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. एक गण अनुसूचित जाती/जमातीच्या महिलेसाठी तर एक गण हा अनुसुचित जाती/जमातीसाठी राखीव झाला आहे.