राजगुरूनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी कोथिंबीरीने भाव खात आपले वर्चस्व दैनंदिन जीवनात किती महत्वाचे असल्याचे भासवत प्रती जुडीचे भाव २५ ते ३० रुपयांपर्यंत चढत्या आलेखात नेऊन ठेवले होते. परंतु निसर्गचक्राच्या उतरत्या किमयेमुळे तिच्या बाजारभावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, सद्यपरिस्थितीत प्रती जुडी चा भाव केवळ १ ते १.५० रुपयांवर आल्यामुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसून येत आहे.
दावडी येथील नवनाथ जाधव या तरुण शेतकऱ्याने कोथिंबीरीचे उत्पन्न घेण्यासाठी धने बी पेरणी करून महिन्याभरात स्प्रिंकलर च्या माध्यमातून ३ ते ४ वेळा पाणी तसेच खत देऊन औषधांची फवारणी करून जीवापाड मेहनतीने कोथिंबीरीचे पीक घेतले. परंतु नेमके पीक काढणीला आल्यावर दुर्दैवाने बाजार भाव कमी झाल्यामुळे मेटाकुटिला येऊन अक्षरशः शेतात ट्रॅक्टर घालून रोटर द्वारे प्रेमाने जपलेल्या कोथिंबीरीला मुठमाती दिली ती केवळ पुढच्या पिकात या पिकाची नुकसान भरपायी भरून काढण्याच्या आशेवर.
शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला की नोकरदार आणि शहरात राहणारा वर्ग तसेच महिलावर्ग महागाईच्या नावानं आकांडतांडव करतात, परंतु शेतकऱ्याच्या या अशा नुकसानीचा वैचारिकदृष्ठ्यासुद्धा पंचनामा करायला कुणीही धजावत नाही याची मोठी खंत या बळीराजास वाटत आहे.