फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राज्यात नवा घोटाळा उघडकीस आला आहे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपदा मित्र किट पुरवठा आणि प्रशिक्षण सेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी करत सदर निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.
एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया
याबाबत दिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटने बचाव किटचा पुरवठा व प्रशिक्षण सेवा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी याच विभागाने प्रशिक्षण व उपकरणासाठी वेगवेगळी निविदा प्रक्रिया राबवली होती. आता मात्र या विभागाने आपदा मित्र किट पुरवठा आणि प्रशिक्षण सेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली आहे. एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी अशा प्रकारे एकत्रित निविदा प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे अन्य इच्छुक पुरवठादार यांच्यावर अन्याय केला जात आहे.
निविदेतील अटी व शार्ती अतिशय दोषपूर्ण
सुमारे २० कोटी रुपये किंमतीच्या या निविदेसाठी निविदापूर्व बैठकही टाळण्यात आली आहे. निविदेतील अटी व शार्ती अतिशय दोषपूर्ण आहेत. प्रशिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अशी निश्चित केली आहे. कला शाखेतील किंवा वाणिज्य जाखेतील पदवीधर जीवरक्षक व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कसे देऊ शकेल, असा प्रश्न विचारला जात आहे. जॉइंट वेंचर साठी अनुमती असली तर यासाठीची पात्रता परस्पर विरोधी आहेत. अशा प्रकारचे अनेक दोष यामध्ये असून एका विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन ही प्रक्रिया राबवली गेली आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून ही प्रक्रिया आहे त्या स्थितीत स्थगित करण्याबाबतचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे.