कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी मॅडमच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यांच्यावर निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज सकाळीच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. भ्रष्टाचारी महिला मुख्याधिकार्यावर कायदेशीर कारवाई शासनाने केली नाही तर, प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित सेल चे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी ठिय्या आंदोलन करताना दिला.
कोरेगाव शहरात कोट्यीवधी रूपये खर्चाचे भाजी मंडई चे काम सुरू असून त्यात लाखो रूपयांचा गैरव्ववहार झाला असून नियमबाह्य पध्दतीने भाजी मंडई चे काम सध्या कोरेगाव शहरात सुरू आहे.कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी खरेदी करण्यात आलेल्या इन्व्हर्टर आणि बॅटरीज मध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
कोरेगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र त्यामधून उत्पन्न केवळ पंचवीस हजार मिळाले आहे.घनकचरा प्रकल्पाबाबत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आढळून आला आहे.कोरेगाव शहरात अनेक अनधिकृत बांधकामे नियमित केली जात आहेत. त्यामधून मुख्याधिकारी लाखो रुपये मिळवीत आहेत.
वरील प्रमाणे अनेक कामकाजात कोरेगाव मुख्याधिकार्याकडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरूच आहे.त्यामुळेच शासनाने कोरेगाव शहरातील मुख्याधिकार्यांच्या भ्रष्टाचारी कारभारची गंभीरपणे दखल घेऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा प्रजासत्ताक दिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे रमेश उबाळे या ठिय्या आंदोलनात दिला.
कोरेगाव तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात कोरेगाव नगरपंचायतीचे राष्ट्रवादीकचे नगरसेवक, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरेगाव नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना, मुख्याधिकार्यांनी विकास कामसाठी जाणीवपूर्वक निधी दिला नाही. मुख्याधिकारी शासकीय अधिकारी आहेत की सत्ताधाऱी पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत आहेत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्याकडून यावेळी करण्यात आला.