मुंबई : जून महिन्यात सुरु होणारा मान्सूनचा पाऊस अद्यापही सुरु न झाल्यानं राज्यात तीव्र पाणी टंचाईची (Water Shortage) स्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडं वाढता उष्णता आणि पाण्याचे स्रोत आटल्यानं दुष्काळाचं सावट (Drought Like Situation) राज्यावर येतंय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यातील 60 टक्के नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. तर उर्वरित 40 टक्के नद्यांना नाल्याचं रुप आलंय.
राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. सुमारे 60 धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातल्या सहा विभागातील धरणांची पाणीपातळी सरासरी 23 टक्क्यांवर येऊन पोहचलेली आहे. पाऊस वेळेवर झाला नाही तर हे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
धरणांमध्ये किमान पाणीसाठाही नाही
राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांत एकूण 2989 मोठे तर 2590 मध्यम प्रकल्प आहेत. या धरण क्षेत्रांत अद्याप पाऊसच सुरु झालेला नाही. जूनमध्ये पाऊसच न झाल्यानं धरणात किमान पाणीसाठाही उपलब्ध नाहीये. बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो अशा काही कारणांमुळं पाऊस अद्याप महाराष्ट्रात पोहचलेला नाही. अशा स्थितीत हे संकट अजून गहिरं होण्याची भीती वर्तवण्यात येतेय.
60 टक्के नद्या कोरड्याच
राज्यातील 60 टक्के नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची स्थिती अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचं समोर आलंय. भूगर्भात 40 टक्केच पाणी शिल्लक असून तेही येत्या काळआत संपल्यास देशासमोरच मोठं संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.