पुणे : आळंदी येथे रविवारी ( दि. २०) कार्तिक यात्रा असल्याने नाशिक, कल्याण, संगमनेर इत्यादी भागातील पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुणे – नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे.
कार्तिक महिन्यातील आळंदीची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या जयंतीनिमित्त आळंदी या ठिकाणी मोठा उत्सव होणार आहे. आळंदी एकादशीनिमित्त नाशिक ते पुणे जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. वारकरी संप्रदायातील भाविक भक्त दिंडीमध्ये सहभागी झाल्याने जुना पुणे -नाशिक महामार्ग दिंडीमय झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना अन्नदान
‘साधूसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’, या उक्तीप्रमाणे कळंब आणि कळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थ दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांचे जागोजागी स्वागत करून त्यांच्या चहापाण्याची नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहेत. कळंब या ठिकाणी उद्योजक रमेश कानडे, युवराज कानडे, उद्योजक नितीन भालेराव, माजी उपसरपंच गंगाराम भालेराव, सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव, सुनील भालेराव ,हेमंत चिखले, मोहन भालेराव, महेश भालेराव, निवृत्ती गुरव, माधव भालेराव यांच्यासह परिसरातील अनेक भाविक भक्त व दानशूर मंडळी दिंडीतील वारकऱ्यांना पूर्वीपासूनच अन्नदान करीत आहेत.
एकलहरेला प्रति आळंदीचे स्वरूप
एकलहरे गावांमध्ये पंधरा ते वीस दिड्यांचा मुक्काम असल्यामुळे प्रति आळंदीचे स्वरूप एकलहरे गावांमध्ये आले होते. एकलहरे येथील साईराज मंगल कार्यालय येथे रामदास डोके यांच्या साईराज मंगल कार्यालयामध्ये अनेक दिंड्यांचा मुक्काम होता. तेथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. तसेच माजी सरपंच संतोष डोके, उद्योजक रामदास डोके, संदीप डोके, प्रवीण खरपुडे, संतोष महाराज डोके, बळीराम डोके,पोलीस पाटील सुमन बोंबे, राहुल डोके, माजी सरपंच ज्ञानेश्वर डोके, किसन महाराज डोके, दिलीप वऱ्हाडी, नवनाथ डोके, राजेंद्र गुळवे, संतोष बाणखेले यांच्यासह गावातील अनेक दानशूर व्यक्तिंच्या निवासी मुक्कामी दिंड्या आल्या असून अन्नदानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली .






