दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दापोलीचा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला! पर्यटन व्यावसायिक सज्ज
दिवाळीच्या सुट्ट्या पडताच पर्यटनाला सुरुवात झाली असून बुकिंग केलेल्या पर्यटकांनी दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे. मात्र यंदा रनिंग पर्यटकांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. वन डे टूरसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढू लागली आहे. दापोलीच्या किनारपट्टीवर 2 तारखेपासून 2.50 ते 3 लाख पर्यटक येऊन गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं येथील पर्यटन व्यवसायिकांनी सांगितलं आहे.
हेदेखील वाचा- प्रसाद भोईर मविआचे अधिकृत उमेदवार, पेण विधानसभेवर भगवा फडकणारच – विजय कदम
दिवाळीच्या सुट्टयांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजली आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणाहून कोकणामध्ये पर्यटक दाखल होत आहेत. कोकणातील रिसॉर्टमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले होते. आता पुढच्या येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे. काहींनी मात्र तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले होते. रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असतात.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक अशी प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी, तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते. अथांग समुद्रकिनारा हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते. नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखविण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्या वेळी याचे आयोजन करण्यात येते. पर्यटकांना केवळ शांतता हवी असते. येथील निसर्ग अनुभवायचा असतो. आणि म्हणून न चुकता ही कुटुंब येथील शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात.
पर्यटकांना येथील सुंदर समुद्र किनाऱ्यांचा, येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना मनोरंजनाचे चार क्षण घालवता यावेत यासाठी कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉल्फिन सफारी, वॉटर स्पोर्ट्स यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिक करतात. समुद्रातील सफर, किनाऱ्यांवरील विविध खेळ, डॉल्फिन दाखविण्याची व्यवस्था यासाठी बोटींची व्यवस्था करण्यापासून पर्यटकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी येथील पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. कोकणातील निसर्गाची माहिती व्हावी, येथील जैवविविधता कळावी यासाठी निसर्ग सहलींचे आयोजनही काही निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.
हेदेखील वाचा- आजपासून पुन्हा सुरू होणार नेरळ-माथेरान टॉय ट्रेन , जाणून घ्या टाइम टेबल आणि बुकिंग डिटेल्स
दरम्यान, याच महिन्यात असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पर्यटकांना पोलिसांच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे. पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातुन कोकणात येताना किमान नऊ ते दहा ठिकाणी पोलीस बंदोबस्तामुळे कडक पध्दतीने सर्व साहित्याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे रनिंग पर्यटकांचे प्रमाण कमी झालं आहे. ऐन मार्च व एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील अशाच प्रकारे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
मोठ्या शहरातील अनेकांना कोकणाबद्दल आपुलकी आणि कुतुहल असते. असे कोकणप्रेमी विविध मार्गांनी कोकणची माहिती मिळवत पर्यटनासाठी जिल्ह्याला पसंती देत असल्याने येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळते. मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरुड, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते.
मुरुड येथील हॉटेल व्यवसायिक प्रबोध जोशी यांनी सांगितलं की, दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम हा किमान 15 दिवस तरी चालतो. या काळात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु हे फक्त अजून चार दिवस चालेल. कारण याच महिन्यात असलेल्या निवडणुकांमुळे इथे येईपर्यंत किमान नऊ ते दहा वेळा तरी पोलीस चेकिंग होते त्याला पर्यटक कंटाळतात. तसेच सध्या ऑनलाइन पेमेंट करणारा पर्यटक जास्त आहे. रोख रक्कम देऊन जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण खूप कमी आहे. सध्या निवडणूकांच्या धर्तीवर होत असलेल्या चेकिंगचा हा परिणाम आहे.
मुरुड येथील हॉटेल व्यवसायिक निलेश मुकादम यांनी सांगितले की, 2 नोव्हेंबरपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. सध्या सर्व फॅमिली पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे. येत्या 20 तारखेनंतर डिसेंबर महिन्याची बुकिंग सुरू होईल. गेल्या तीन दिवसात 2 ते 3 लाख पर्यटक येथे येऊन गेले आहेत आणि पर्यटकांची ही संख्या सध्या वाढतच आहे.