E-Peek Pahani Survey: ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; ऑफलाईन पिक पाहणीसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज
ई-पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीने पिकांची स्थळ पाहणी करून नोंद करण्याची ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी राहून गेली आहे, त्यांनी ही संधी न दवडता तात्काळ अर्ज करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत मंडळ अधिकारी अध्यक्ष म्हणून, तर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी सदस्य म्हणून असतील. ही समिती संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. (Farmers News)
महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे, ज्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पिक पाहणीची नोंद केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आधीच गाव नमुना क्रमांक १२ वर प्रतिबिंबित झाली आहे, त्यांच्या नोंदींमध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण
तहसीलदार अतुल पाटोळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, शासनाच्या योजनांचा लाभ, नुकसानभरपाई, विमा व इतर कृषीविषयक मदतीसाठी पीक नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २४ डिसेंबरपूर्वी अर्ज करून आपली पिक पाहणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. या निर्णयामुळे तासगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, राहून गेलेल्या पीक नोंदी पूर्ण करून भविष्यातील शासकीय लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.






