अमरावतीत भूकंपाचे बसले सौम्य धक्के(फोटो सौजन्य: iStock)
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. गावात उपस्थित असलेल्या तलाठी आणि ग्रामसचिवांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. दुपारी अचानकपणे परिसरात हादरे जाणवले. काही लोकांच्या घरातील भांडी खाली पडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. शिवणगाव फत्तेपूर येथे दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. याआधी सुद्धा परिसराममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर भूकंपाच्या तीव्रतेबाबत कोणताही संदेश प्राप्त झालेला नाही. भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : Philippines Earthquake : फिलीपिन्सला पुन्हा ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप; वारंवार येणाऱ्या भूकंपांची काय आहेत कारणे?
दरम्यान, भूकंपाची तीव्रता आणि क्षेत्रीय तपासणी (सर्वेक्षण) करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग, नागपूर येथील पथक घटनास्थळी पाठवण्याबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार, आता याबाबतची अधिक माहिती मिळू शकणार आहे.
फिलिपिन्समध्ये मोठा भूकंप
भारताबाहेर अनेक भूकंप झाले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वीच, फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या शक्तीशाली भूकंपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांन त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. तसेच भूकंपानंतर पुन्हा धक्के बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्र (EMSC) नुसार, भूकंपाची खोली ६२ किलोमीटर (३८.५३ मैल) होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या लोकांना उंच जमिनीवर जाण्याचा सल्ला दिला आहे. आपत्कालीन सेवा सतर्क आहेत आणि नागरिकांना सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.