मुंबई : चांगल्या पेरणीनंतरही कमी पावसामुळे यंदा देशात खाद्यतेलबियांचे नुकसान झाले. परिणामी, खाद्यतेल उत्पादनात 40 टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट होऊन आयातीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश असलेल्या भारतात एकूण मागणीच्या 40 ते 45 टक्केच खाद्यतेल तयार होते. उर्वरित खाद्यतेल आयात केले जाते. एकूण आयातीत जवळपास 65 टक्के पामतेलाचा समावेश असतो.
भारतात तयार होणाऱ्या 45 टक्के खाद्यतेलात जवळपास 25 टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान (तांदळपासून) आणि भुईमुग यांचा समावेश असतो. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात यंदा खरिपातील तेलबिया पेरणी क्षेत्रात दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.६९ टक्क्यांची घट झाली असताना सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन पेरणीत दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 0.96 टक्के वाढ होती. मात्र खरिपात घेतल्या जाणाऱ्या भुईमुग, एरंडी, तीळ, जवस, सोयाबीन व सूर्यफुल या सहा प्रकारच्या तेलबियांचे उत्पादन मागीलवर्षीच्या 261.50 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा फक्त 215.33 लाख टन उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. या तुटीमुळेच देशात खाद्यतेल आयातीला जोर आला आहे.
खाद्यतेल आयात ११.६० लाख टन
अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशननुसार, नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेल आयात 11.60 लाख टन इतकी झाली. त्यामध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत 13 टक्क्यांची वाढ झाली. भारतात सर्वाधिक आयात ही पामोलिन तेलाची होती. यालाच व्हेजिटेबल ऑइल’ असेही संबोधले जाते. नोव्हेंबर महिन्यात अशा शुद्ध पामोलिन तेलाची आयात ऑक्टोबरच्या 53 हजार 497 टनाच्या तुलनेत तब्बल 1.71 लाख झाली. तर सोयाबीन तेलाची आयातही ऑक्टोबरच्या 1.35 लाख टनाच्या तुलनेत 1.49 लाख टनावर पोहोचली आहे. भारतात खाद्यतेल आयातीची मागणी वाढल्यानेच दरातदेखील वाढ झाली आहे.
असोसिएशननुसार, नोव्हेंबर महिन्यात भारतीय बंदरांवर शुद्ध पामोलिन तेलाचा दर ऑक्टोबरच्या 849 डॉलर प्रति टनावरुन 876 टनावर गेला. तर कच्चे पामोलिन तेल ऑक्टोबरच्या 867 डॉलरवरून 897 डॉलर प्रति टनावर पोहोचले आहे. त्याचवेळी कच्चे आयातीत सोयाबीन तेल भारतीत बंदरांवर 1068 डॉलर प्रति टन झाले आहे. हा दर ऑक्टोबर महिन्यात 986 डॉलर इतका होता. तर कच्च्या सूर्यफूल तेलाचा दर 920 डॉलर प्रति टनावरून 979 डॉलरवर गेला आहे.