हिंदी भाषेविरोधात शिंदेंचेही मंत्री आक्रमक; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर्शवला विरोध
तिसऱ्या भाषेवरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंनी विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारमधील मतभेद उघड झाले आहेत. बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीही विरोध दर्शवला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी याबाबत स्पष्टपणे आक्षेप नोंदवत हिंदी सक्तीचा विरोध केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने जर लवकरच भूमिका स्पष्ट केली नाही, तर शिंदे गटाकडून आणखी तीव्र भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार एक समिती स्थापन करून प्रश्नावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हेही सरकारच्या या निर्णयाविरोधात एकत्र आले आहेत. मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधू 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार असून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा त्याचा मार्ग असणार आहे. या मोर्चामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. अजित पवारांनी स्पष्टपणे मत मांडले की, हिंदी भाषा शिकवायचीच असल्यास ती पाचवीपासून असावी. त्याचबरोबर ठाकरे बंधूंचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करण्याचंही त्यांनी सूचित केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हिंदीच्या मुद्द्यावर ठाम असून, भाजपकडून हिंदीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं स्पष्ट दिसून येतं. तर शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हिंदीला विरोध करताय तर इंग्रजीलाही करा’ असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या सर्व घडामोडींनी तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून सरकारच्या आघाडीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा समोर आला असून पुढील काही दिवसात यावर निर्णायक घडामोडी होण्याची शक्यता आहे.