जिल्हा परिषद निवडणूक 2026 (फोटो- सोशल मिडिया)
कणकवली तालुक्यात ८०० कर्मचारी तैनात
ईव्हीएम मशिनचे सीलिंग झाले पूर्ण
११८ ईव्हीएम मशीन झाले तयार; २८ मशीन राखीव
कणकवली: ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कणकवली तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, सुमारे कणकवली तालुक्यात ८०० अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार राखीव कर्मचारीही उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश काटकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. ईव्हीएम मशीनचे सिलिंगचे काम पूर्ण झाले असून, निवडणूक कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यांत प्रशिक्षण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.
राखीव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण सुमारे ८०० कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी तैनात राहणार आहेत. निवडणूक साहित्य ६ फेब्रुवारी रोजी १४ एसटी बसेस आणि १४ जीप गाड्यांच्या माध्यमातून तालुक्यातील मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एकूण ११८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ११८ ईव्हीएम मशीन आणि २८ राखीव ईव्हीएम मशीन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
१७ मतदान केंद्रांवर नाही होणार मतदान
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी व शिपाई अशी व्यवस्था करण्यात आली असून, सर्व केंद्रांवर मिळून ८०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यासोबतच १४ झोनल अधिकारी आणि चार राखीव झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांवर मतदान होणार १० नाही. त्यामुळे सुमारे ११७ कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी वाजल्यापासून निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश काटकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसेस व जीप गाड्यांच्या माध्यमातून मतदान साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविले जाणार आहेत.
23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.






