इस्लामपूर : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा (NCP Chief) राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडलेला नाही. राजीनामा दिल्याबद्दल शरद पवारांचे अभिनंदन करत असल्याची भूमिका माजी ज्येष्ठमंत्री डॉ.आण्णासाहेब डांगे (Dr. Annasaheb Dange) यांनी मांडली.
डांगे म्हणाले, ‘आता वयाची 82 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18-20 वर्षांपासून जीवघेण्या कॅन्सर आजाराने पीडित आहेत. असे असले तरी न थांबता आज अखेर परिश्रम घेत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांना आजारी पडल्यामुळे ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यातून आता सुदैवाने बरे झाले आहेत. त्यांना पुन्हा तुम्हीच पक्षाचे अध्यक्ष व्हा म्हणून कशासाठी आग्रह करायचा?
तसेच पवारसाहेब यांच्या पसंतीने पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा पक्षातील अन्य कोणावरही सोपवावी व नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पाच ते दहा पदाधिकारी यांची टीम तयार करून पवारसाहेब यांचा अनुभव समजावून घेत पुढील कामाची दिशा काय असावी? कसे करावे? हे त्यांच्या विचारसरणीतून व अनुभवातून ऐकून घेऊन प्रत्यक्ष मैदानात लढण्याचे काम नव्या पिढीने केले पाहिजे. प्रकृती साथ देत नसताना आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा होत असताना त्यांनाच या वेदना सहन होत नाहीत. अशावेळी त्यांनाच तुम्ही अध्यक्ष व्हावे असे म्हणणे कितपत योग्य आहे?’
…म्हणून त्यांनी दोन-तीन दिवसांचा अवधी घेतला
विचार करायला चिंतन करायला त्यांनी दोन तीन दिवसांचा अवधी घेतला आहे. त्या चिंतनातून पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाचे घोंगडे स्वत:चे गळ्यात अडकून घेण्यापेक्षा जे नवीन अध्यक्ष करायचे आहेत. त्यांना व नवीन आठ ते दहा जणांच्या टीमला आपल्या कामाची दिशा समजावून सांगावी. राजकारण करत असताना कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे याचे भान ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्यासारखे समाजातील कार्य करायला प्रेरित व्हावे, असे माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटते.






