सौजन्य - नवराष्ट्र टीम
पंढरपूर : गेेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातचं आता पंढरपूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या झेंडूच्या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे संतप्त होऊन ती फुलं थेट रस्त्यावर फेकून दिले आहेत. राज्यात दिवाळीचा सण साजरा होत असताना पंढरपूर तालुक्यात काही शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्याने दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून झेंडूची फुलं बाजारात विक्रीसाठी आणली होती. मात्र, बाजारात १० रुपये किलो देखील भाव मिळत नसल्याने त्यांना संताप अनावर झाला. वाहतूक, तोडणी आणि मजुरीचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्याने रस्त्यावरच फुलं फेकून आपला निषेध नोंदवला.
शेतकरी म्हणाले, अतिवृष्टीने नुकसानीची भर पडलीय, सरकारने ओला दुष्काळही जाहीर केलेला नाही. जाहीर केलेली मदत अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी तरी कशी करायची? तालुक्यात यावर्षी जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने अद्यापपर्यंत ठोस मदत दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. फुलांसारख्या नाशिवंत शेतीमालाला वेळेवर आणि योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी अशी हतबलता व संतापाची वेळ शेतकऱ्यावर येणं, हे शासन आणि बाजारपेठेच्या व्यवस्थेचं गंभीर अपयश आहे.