Farmers Are Trying To Speed Up Pre Sowing Cultivation Work Increase Production Nrdm
खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न
आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीची कामे शेतकरी शेतामध्ये करताना दिसून येत आहे. शेतात शेण खत टाकून पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यानंतर पिके येण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे.
मंचर : आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीची कामे शेतकरी शेतामध्ये करताना दिसून येत आहे. शेतात शेण खत टाकून पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यानंतर पिके येण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. जुन पासून ग्रामीण भागात पावसाला सुरूवात होईल. त्यामूळे आवश्यक पेरणी पूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. सर्वत्र कामाची लगबग पाहण्यात येत आहे.
मंचर, घोडेगाव अवसरी खुर्द, तांबडेमळा, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पिंपळगांव, खडकी, भागडी, भराडी, रांजणी, वळती, पारगाव शिंगवे, काठापूर, निरगुडसर, जारकरवाडी, लोणी धामणी वडगाव पीर, मांदळेवाडी, शिरदाळे इत्यादी गावांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरट करून झाली आहे. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल. त्या अगोदर शेताची मशागत करून शेती लागवडीसाठी तयार करून ठेवली जात आहे. त्यासाठी शेतामध्ये शेणखत टाकून झाले आहे. काही भागात शेणखत पसरवण्याचे काम सुरू झाले आहे.
मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी
खरीप हंगामात पिकाच्या उत्तम वाढीसाठी नांगरट, शेण खत टाकने, कुळवणी, रोटरणी अशी कामे केली जातात. पीक लागवडी पूर्वी जमीन भुसभुशीत करणे, तण काढणे, शेतजमीन पेरणीयोग्य केल्यास पिकाचे उत्पादन चांगले येते. मशागत केल्याने जमीन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहून पिकांना पोषक ठरते. जमिनीचा पोत सुधारतो. पावसाचे पाणी जमिनीत साठवणूक करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे ओलावा टिकुन राहतो. मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
जमिनीत रासायनिक क्रिया चांगली होऊन पिकाला पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पिकाची उगवण आणि वाढ चांगली होऊन उत्पन्नात वाढ होते. जमीन नांगरल्याने आधीच्या पिकाची मुळे, पालापाचोळा गाडले गेल्याने ते कुजून मातीतील सेंद्रिय सूक्ष्म अन्नद्रव्ये मध्ये वाढ होते. जमिनीतील जीवजंतू, कीटक आदींचा उन्हाने नाश होतो. त्यामुळे काही भागात जमीन भाजली जात असल्याचे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Farmers are trying to speed up pre sowing cultivation work increase production nrdm