सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाच दिवस उलटले आहेत. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन शासनाचे लक्ष वेधले. दौंड तालुक्यातील कानगाव येथील विठ्ठल मंदिरात १८ सप्टेंबर पासुन कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळवा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक झालेला दिसून आला.
शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत तीव्र घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त. कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजार भाव नाही व पावसाने सुद्धा कहर केला आहे. त्याचप्रमाणे वखारीतील कांदा खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी आता आक्रमक झाला आहे. कारण शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असा आरोप आंदोलक करीत आहेत.
ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीमालाच्या बाजार भावा वरती अवलंबून असते. शेतीला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुलांची शिक्षणाची फी, कर्ज, दवाखाना खर्च व शेतीसाठी नवीन भांडवलासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक आणीबाणी तयार झाली आहे. यासाठी शासनाने त्वरित योग्य पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांच्यात प्रचंड आक्रोश होऊन राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्याकडे व कर्जमुक्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या अर्धनग्न आंदोलनात भानुदास शिंदे, भाऊसाहेब फडके, रामदास पवार, दादासो गवळी, नानासाहेब नलवडे, नानासाहेब कोऱ्हाळे, राजेंद्र मोरे ,संतोष गायकवाड, सुरेश फडके, किसन चौधरी, नानासाहेब फडके, डॉ. बापूराव फडके, दुर्गादास मुळीक, राजेंद्र कोंडे, दत्तात्रय मोरे, मच्छिंद्र गवळी, बाळू गवळी, मारुती कोंडे आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
हे सुद्धा वाचा : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आक्रमक; नेमकं काय आहे मागणी?
कांद्याने पुन्हा केला वांदा
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रति दहा किलो २०० रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.