पुरंदर एअरपोर्टला शेतकऱ्यांचा विरोध
सासवड: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावामध्ये प्रशासनाने जबरदस्तीने ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी त्यास कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे करणारा ड्रोन फोडून टाकला. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने सर्व्हे रद्द करणार असल्याचे सांगितले. मात्र लेखी हमी दिल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका घेतली. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून सर्व्हे करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्रशासनला भर उन्हात दिवसभर रस्त्यावरच अडवून ठेवले. संपूर्ण रस्तावर चक्काजाम करून वाहतूक बंद केली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र प्रकल्पाला सातही गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कडाडून विरोध केला आहे. तब्बल आठ वर्षे विरोध करण्यात येत असून मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकरी मोर्चा घेवून गेले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता प्रकल्प बाधित असलेल्या एखतपूर गावातील जमिनीचा ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शुक्रवारी दि. २ रोजी भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी असे सर्वजण महसूल अधिकारी तसेच पोलीस फौजफाटा घेवून सर्व्हे करण्यासाठी एखतपूर गावात सकाळी ११ च्या दरम्यान पोहोचले. याची शेतकऱ्यांना माहिती मिळताच प्रकल्पबाधित असलेल्या एखतपूरसह वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमून अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध केला.
Purandar Airport: पुरंदर विमानतळाचे नक्की काय होणार? शेतकऱ्यांचा विरोध तर सरकार ठाम; वाचा सविस्तर
परंतु तरीही प्रशासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लोकांचा जमाव जमला असतानाच एका बाजूने ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण लागताच काही शेतकऱ्यांनी संबंधित ड्रोन पळवून नेत फोडून टाकला, त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांत चांगलाच तणाव वाढला. पोलिसांनी आवाज वाढवताच शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. तसेच ज्या गाडीत ड्रोन मशीन ठेवले होते, त्या गाडीलाच महिला शेतकऱ्यांनी संपूर्ण वेढा घातला. पोलिसांनी वारंवार विनंती आणि धमकी देण्याचा प्रयत्न करूनही महिलांनी आक्रमक होत रस्त्यावरच ठाण मांडले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक होत होती. अनेकवेळा पोलिसांनी महिलांना धमक्या देवून सर्व्हे करण्याचा तसेच रस्त्यावारुटन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही.
अखेर पोलिसांनी कोणताही ड्रोन सर्व्हे करणार नाही असे प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले. त्यावर तुम्ही लेखी हमी दिल्यास आंदोलन थांबवितो असे सांगितले. मात्र अधिकारी लेखी हमी देत नसल्याने शेतकऱ्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सायंकाळी पाच वाजता पुन्हा जादा महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक बोलाविण्यात आली. मात्र तरीही शेतकरी आक्रमक होत असल्याने सायंकाळी सहा वाजता दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले.