रखरखत्या उन्हातही शेती मशागतीची कामे! मान्सूनची चाहूल; संकटांचा सामना करत बळीराजाने कंबर कसली
यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा ४४ अंशाच्यावर आहे, तर दुसरीकडे वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने व अनुकूल गतीने सुरू असल्याचे नुकतेच हवामान खात्याने जाहीर केले. त्यामुळे भरदुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले असतानाही उद्याच्या आशेवर जगणारा बळीराजा मात्र रखरखत्या उन्हाची पर्वा न करता खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार
जिल्ह्यात बहुतांश शेती ही कोरडवाहू पद्धतीची आहे. त्यामुळे खरिपाच्या लागवडीची पूर्ण दिशा मान्सून आगमनावरच अवलंबून असते. त्या अनुषंगाने शेतकरी आपले नियोजन करतो. यावर्षी मान्सूनवर ‘अल निनोचा’ प्रभाव राहील, असे भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. मान्सूनवरील अल निनोच्या प्रभावामुळे हवामान विभागाकडूनदेखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा सरासरी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या उद्देशाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हात घामाच्या धारा झेलत शेतकरी शेतात राबत होता. आता मे महिन्यात उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण, वादळीवारे आणि तुरळक अवकाळी पावसाच्या सरी यामुळे वातावरणात कमालीचा बदल होत आहे. या बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेती करणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने उत्पादन घटत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही.
सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. उपलब्ध मजुरांचे दरही वाढले आहेत. त्याचबरोबर ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ‘कर्ज काढून शेती करावी लागते आणि उत्पादनाला योग्य दर मिळत नाही,’ अशी खंत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा
यंदा उत्पादन कमी असून शेतमालाचे दरही घसरल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरी, इंधन दरवाढ आणि नैसर्गिक संकटांचा फटका यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत असतानाही बळीराजा मात्र हार मानायला तयार नाही. सर्व संकटांवर मात करत नव्या आशा आणि नव्या उमेदीने पुन्हा शेतीची तयारी करणारा शेतकरी आजही काळ्या मातीत भविष्याचे स्वप्न पेरताना दिसत आहे.






