कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा, खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदार संघात एक असा प्रकार समोर आला आहे. तो ऐकून खरंच या नेत्यांचा महापालिका प्रशासनावर वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता तयार करण्यात आलेले शौचालय अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्यात आले. धक्कादायक म्हणजे या शौचालयाची तक्रारीची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. शौचालयाच्या कंत्राटदाराकडे पैशाची मागणी करीत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळते. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याला यशही आले होते. कोविड काळात सूर्यवंशी यांनी जे काम केले ते उल्लेखनीय होते. मात्र त्यानंतर भाऊसाहेब दांगडे आले. त्यांच्यानंतर इंदूराणी जाखड या दोन्ही आयुक्तांचा अधिकारी वर्गावर कोणताही वचक नाही. हे उघड झाले आहे. कारण कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात गफूर डोन ही महाालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत शौचालय आहे. त्याची दुरावस्था झाली आहे. एक सार्वजनिक शौचालय आहे. ते लांब आहे. ही शाळा कल्याण शीळ रस्त्यालगत असल्याने वाहनांच्या रहदारीचा धोका असतो. त्यामुळे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यास सांगून विद्यार्थ्यांना शौचालयाचे काम सुरु केले. स्वखर्चातून काम केले जात होते.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्याची तक्रार केली. शौचालय तयार करणारे सादीक शेख यांनी त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यासोबत चर्चा केली. तक्रार मागे घेण्यासाठी एक रक्कम ठरली. तक्रारदाराला पैसे मिळाले नाही. त्याने शौचालय तोडण्यासाठी तगादा सुरुच ठेवला. अखेर महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी शौचालयाचे काम जेसीबीने पाडून टाकले आहे. या कारवाई विराेधात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या हजारो संख्येच्या बेकायदा बांधकामे सुरु आहे. परंतू महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केवळ महापालिका शाळेचे शौचालय दिसले हे चकित होण्यासारखीचं बाब आहे.