कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाच्या कल्याण पश्चिमेतील बारावे घनकचरा प्रकल्पात आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीत सुमारे 5 कोटी रुपयांची हानी झाली असावी अशी प्राथमिक माहिती मिळाली.
कल्याण डोंबिवली मनपाच्या बारावे येथील 100 मेट्रिक टन ड्राँय वेस्ट प्रकल्पात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. बारावे घनकचरा प्रकल्पात सुमारे 100 मेट्रिक टन सुका कचरा जमा केला जातो. यात कचऱ्याचे विलगीकरण करून काच, लोखंड, इतर धातू, ईलेक्ट्रॉनिक कचरा भंगार, प्लास्टिक वेगळे करीत उर्वरित सुका कचऱ्यापासून सुमारे 20 दिवसांची प्रक्रिया करून (आर डी एफ) तयार होते ते सिमेंट कंपन्याना पाठविले जाते. साधरण या प्रोसेस पध्दतीमुळे प्रकल्पात सुमारे 2 हजार टन कचरा प्रोसेससाठी पडून असतो.
रविवारी पहाटे 5 वा. लागलेल्या या आगीमुळे प्रकल्पातील मशिनरी, जळली असल्याने या आगीमुळे सुमारे साडेचार ते 5 कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अधिकारी सूत्राकडून मिळाली आहे. यापूर्वी हि बारावे घनकचरा प्रकल्पात लागलेल्या आगीत सुमारे दोन ते तीन करोडचे नुकसान झाले होते. त्यानंतर सुमारे ५ महिन्याच्या कालवधीनंतर प्लांट कार्यन्वित झाला होता. वारंवार छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना पाहता प्रशासनाने आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करीत यंत्रणा दक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.
बारावे घनकचरा प्रकल्पाच्या आगीच्या घटनामुळे लगतचे रहिवासी आगीच्या धुराच्या त्रासाने संताप व्यक्त करीत असून हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी जोर धरु पाहत आहे. या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामध्ये बारावे ट्रान्स्फर स्टेशन प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. येथे नेहेमी आग लागत असते. याचा अर्थ प्रशासनाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे व नियमांचे उल्लंघन करून येथे कचरा साठवला जातो. तेथे कोणतेही प्रकारचे विलगीकरण होत नाही. हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यासाठी शाप ठरत आहे तरी हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
कल्याण डोंबिवली मनपाचे प्रमुख अग्निशमन आधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण डोंबिवली मनपाच्या ७ अग्निशमन बंबाच्या गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सुमारे आठ तासाच्या अथ्थक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण आणित धुराचे लोट कमी करण्याचे काम करीत आग विझवली असल्याचे सांगितले.