Photo Credit- Social media शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्री, माजी आमदार करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांत राज्याच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये नेते येणे-जाणे सुरू झाले आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नुकताच मोठा झटका बसला, कारण माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षासाठीही आव्हान निर्माण होणार आहे. या भागातील काही प्रमुख नेते, माजी मंत्री आणि माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन माजी मंत्री, तीन माजी आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस लवकरच अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. या नेत्यांमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, अमळनेर येथील महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, तसेच माजी आमदार दिलीप सोनवणे आणि दिलीप वाघ यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्तेही नव्या गटात प्रवेश करणार आहेत.
या सर्व नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा येत्या ३ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. या निर्णयाची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
अलीकडच्या काळात महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीच्या पक्षांकडे वळताना दिसत आहेत. यामुळे आघाडीतील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांना याच पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांचा साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते. त्यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात पाऊल ठेवले होते आणि आज दक्षिण मुंबईतील एक प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जातात.
रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर मिटला? रायगडात तटकरे तर नाशिकमध्ये महाजन करणार झेंडावंदन