पिंपरी : एटीएम कार्डद्वारे (ATM Money) पैसे काढत असताना अडचण येत असताना दोन तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा केला. हात चालाखीने कार्ड बदलले व त्या कार्डद्वारे त्यांनी पुढे 1 लाख 99 हजार रुपये काढून घेतले. हा सारा प्रकार दिघी येथे 24 ते 25 डिसेंबर 2022 मध्ये घडला. याप्रकरणी राहूल सुरेंदर शहा (वय 29 रा.दिघी) यांनी गुरुवारी फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फिरायला रत्नागिरी य़ेथे जातान त्यांनी त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्या वडिलांना दिले. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांना पैसे निघाले नाहीत. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला.
मदत करत असताना त्यांनी हातचालाखीने कार्डची आदलाबदल केली. पैसे निघत नाहीत कार्ड खराब आहे असे सांगितले. फिर्यादीचे वडील घरी निघून गेले. पुढे आरोपींनी दोन दिवसात फिर्यादीच्या खात्यावरून 1 लाख 99 हजार रुपये काढून घेतले. त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात फसणूकीचा गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.