पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन; अजित पवारांचा मोठा प्लॅन
आम्ही पुण्यात राहत असल्यामुळे आम्हालाही पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. बाहेरचे कोणी आले तर ते तेवढ्यापुरतेच येतील त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असंही अजित पवरांनी म्हटलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी विविध विकासात्मक आश्वासने दिली आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या सोयी-सुविधांवर भर देत त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अजित पवार यांनी मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात येणार असून, ‘टँकरमुक्त पुणे’ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
शहरातील अपूर्ण असलेले ‘मिसिंग लिंक’ रस्ते पूर्ण करण्यात येणार असून, कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासह टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार असून, १५० मॉडेल शाळांना मंजुरी देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. या घोषणांमुळे पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटरअकाउंटवर जाहीरनाम्याचा पाया दिला आहे. “पाच काम – पक्का वादा” या घोषवाक्यासह पुण्याच्या विकासाचे काही मुद्दे देण्यात आहेत. ” गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर ज्या “अलार्म”चा आवाज ऐकत आहे, त्यामध्ये पाण्याची टंचाई, वाढती वाहतूक कोंडी, ढासळती आरोग्य सेवा, पावसाळ्यातील पुरस्थिती आणि वाढतं प्रदूषण यांचा समावेश आहे.. या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर देणारा हा जाहीरनामा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडला. हे केवळ घोषणा पत्र नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा दस्तऐवज आहे.”
अजित पवार म्हणाले, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्याचा पाया आहे “पाच काम – पक्का वादा”.
✅ दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा.. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार.
✅ रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार.
✅ पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार.
✅ स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या ९८० MLD सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.
✅ आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, ICU, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.
विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, स्वाभिमानानं उपजीविकेसाठी सहाय्य केलं जाणार.
शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच १५० “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज ९०% विद्यार्थी ऑनलाईन शिकू इच्छितात, त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स अत्यावश्यक आहेत.
हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांसाठी आहे. पूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या जशा पूर्ण केल्या, तसाच पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प आहे. हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, मोजमापासाठी आहे. दररोज पाणी नाही, रस्ते खराब झाले, आरोग्यसेवा मिळाली नाही किंवा प्रदूषण वाढलं, तर आम्हाला जाब विचारा. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मी हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवला आहे.
Pune Municipal Corporation, Nationalist Congress Party, joint manifesto, Ajit Pawar, free metro service, free bus service, PMPML buses, traffic congestion in Pune, fuel wastage, pollution-free Pune






