फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत. जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर रात्री अखेर २० च्या घरात पोहोचला होता. आज शनिवार दि १ नोव्हेंबर रोजी त्यात ५ रुग्णांची वाढ झाली असून पैकी जानकी फसाळे (६५) यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शुक्रवार आणि शनिवार दिवस अखेर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेले आणि विनंतीवरून खाजगी रुग्णालयात दाखल होऊन पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती आत्ता स्थिर आहे.
शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर च्या दिवस आणि रात्री अखेर एकूण २० रुग्ण बाधित झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री उशिरा आणखी ३ रुग्ण दाखल झाले होते. यातील जानकी फसाळे यांना नाशिक येथे संदर्भ सेवा देण्यात आली होती. तर शनिवारी सकाळी आणखी दाखल झालेल्या २ रुग्णांसह एकूण २२ रुग्णांवर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात अहोरात्र उपचार करण्यात आले असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिलेली आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, ” बोरशेती येथे शुक्रवार रात्री पासूनच खबरदारीची उपाययोजना सुरू केली असून जलशुद्धीकरण, पाणी आणि आणि शौच नमूने तपासणी व अत्यावश्यक बाब म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक बोरशेती येथे तैनात केले असून स्थानिक ठिकाणीच तातडीच्या प्रथमोपचाराची तजवीज करण्यात आली आहे. शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतरही पुढील आठवडाभर आरोग्य कर्मचारी येथे अधिक खबरदारीचा उपाय अवलंबणार असून गावालगत वरच्या बाजूला असलेल्या ओहोळातील विहीरीचे पाणी ग्रामस्थांना पिण्यास ग्रामपंचायतीच्या संमतीने मज्जाव करण्यात आला आहे.






