उरण : खोल समुद्रात जहाज अडकतं आणि मग कोणीतरी त्या खलाशांना वाचवायला येतं असं अनेकदा सिनेमात पाहायला मिळालं आहे. पण अंगावर काटा आणणारा सुटकेचा थरार उरणच्या समुद्रात घडला आहे. खोल समुद्रात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि उंचच उंच उसळणाऱ्या लाटांमुळे गेल्या आठवडाभर किनारपट्टी भागात भीतीचं वातावरण होतं. या भीषण वादळात अडकलेल्या दोन मासेमारी बोटी महागौरी’ आणि ‘नमो ज्ञानेश्वरी’ या समुद्रात चार दिवस बेवारस अवस्थेत होत्या. या दोन्ही बोटीवरील एकूण 16खलाशी मृत्यूच्या दाढेत अडकले होते. मात्र या संकटकाळात उरण तालुक्यातील करंज येथील तरुण अतिश कोळी हा सर्वांसाठी ‘देवदूत’ ठरला.
अरबी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका मासेमारी नौका आणि त्यावरील खालाशांना बसला आहे. मुंबई बंदरातील ‘महागौरी’ आणि ‘नमो ज्ञानेश्वरी’ या दोन बोटी मासेमारीला गेल्या असता, वादळात अडकून त्यांच्याशी संपर्क तुटला होता. वादळामुळे वारा आणि पाऊस एवढ्या जोरात होता की, बोटींचा ताबा पूर्णपणे सुटला. दोन्ही बोटींचे इंजिन बंद पडले आणि बोटीवरील खलाशी आपला जीव वाचवण्यासाठी देवाचा धावा करुलागले.
उसळलेल्या लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे बोटिंना केव्हाही जलसमाधी मिळून त्यावरील खालाशांचा जीव जाण्याची भितिजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच सोमवारी (27ऑक्टोबर) संध्याकाळी उरणच्या करंजा किनाऱ्यावरून आतिष कोळी याने आपल्या बोटीसह मदत मोहिम सुरू केली. त्याच्यासोबत तांडेल भाऊदास कोळी, एक तांडेल आणि दोन मॅनेजरही होते. मोबाईल जीपीएसच्या साहाय्याने त्यांनी बोटींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे काहीच दिसत नव्हतं. जवळपास 13तासानंतर शोधमोहिमेला यश आले. वादळात अडकलेल्या बोटी सापडल्या आणि या दोनही बोटी सोबत असलेल्या बोटीला बांधून खेचत किनारी आणल्या. यावेळी घाबरलेले खलाशी जीव वाचवणाऱ्या आतिषला देवदूत म्हणत त्याचे आभार मानत होते. यातील काही खलाशांना नंतर उपचारांसाठी दााखल करण्यात आलं.
अतिश कोळी याने जीवाचा धोका पत्करून दोन्ही बोटींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 10 ते 12फूट उंच लाटा,वादळी वारा आणि शून्य दृश्यमानता अशा कठीण परिस्थितीत त्यांनी मासेमारांना बाहेर काढण्याचे धाडस दाखवले. दोन्ही बोटींचे नांगर एकमेकांना गुंतलेले असल्याने त्यांनी प्रथम बोटी ‘टॉयिंग’ करून किनाऱ्याच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. चार ते पाच दिवसांपासून समुद्रात अन्नाविना आणि पिण्याच्या पाण्याविना अडकलेल्या खलाशांचे हाल झाले होते.
मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन्ही बोटी अतिशच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात यश आले. खलाशांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि ते सर्व अतिश कोळीला ‘देवदूत’ म्हणत सतत त्याचे आभार मानत होते. वादळात लढत 36 तासांहून अधिक कालावधी त्यांनी जीव धोक्यात घालून दिला. या घटनेत अतिश कोळी, भाऊदास कोळी आणि त्यांच्या टीमने दाखवलेले धाडस खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. समुद्रातील जीवघेण्या परिस्थितीत मासेमारांचे जीव वाचवणे हे कोणालाही शक्य नाही. पण उरणच्या या तरुणाने ते करून दाखवले.






