फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोड धंदा म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा च्या मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दूधाळ म्हैस खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या म्हैसीना भविष्यात काही समस्या उद्भवल्यास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते.परंतू म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षा दोन वर्षातच त्यांच्या तबेल्यातील दोन म्हैसी मेल्या आहेत.विशेष म्हणजे या म्हैसी साठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला होता तरी देखील त्याना विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घ्या यासाठी मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये आणून बँकेच्या समोर ठेऊन आपला रोष व्यक्त केला आहे.
मोखाड्यातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी २०२२ मध्ये दहा म्हैसी खरेदी केल्या त्यासोबतच चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून काढला होता जेणेकरून म्हैस मेली तर नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम आपल्याला मिळेल परंतु त्यांच्या तबेल्यातील पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली आणि दूसरी म्हैस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्यूमुखी पडली आहे.मात्र विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठे कर्मचाऱ्यांमुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसु दिघा यांना मिळालेले नाहीत आणि आता मेलेल्या म्हैसीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये भरुन बँकेच्या समोर आणून ठेवली होती.एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी भुमिका घेतली होती.त्यामुळे काहीकाळ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुध्दा यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घोसाळी गावातील शेतकरी मधू माळी,गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हैसी खरेदी केल्या होत्या त्यांच्या म्हैसी मरुन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे तरी सुद्धा त्यांना ही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
त्यामुळे मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेकडून वारंवार पशुपालक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असा आरोप पशुपालक शेतकऱ्यांनी केला आहे.यावेळी मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख,वासुदेव खंदारे नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँके कडून शेतकऱ्यांची फसवणूक
मागील काही वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून म्हैस खरेदी करण्यासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकदाही म्हैस मेल्यानंतर विम्याची रक्कम मिळालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.तर याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षेभरात ती म्हैस मेली तरी सुद्धा घेतलेले कर्ज हे व्याजासह पशुपालक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली केले जात आहे.
त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहीली तर काही पशुपालक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल इशारा यावेळी दिला आहे.






