अण्णांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)
अण्णा हजारे यांनी देशातील तरुण पिढीच्या या अनोख्या पाऊलाचे कौतुक करताना सरकारचे कान टोचले आहेत. ते म्हणाले, “या पक्षाचे नाव ऐकायला थोडे विचित्र वाटू शकते, परंतु त्यामागील तरुणांचा संताप आणि व्यवस्थेविरुद्धचा विरोध आपल्याला समजून घ्यावा लागेल. युवाशक्ती हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. जेव्हा कोट्यवधी तरुण अशा प्रकारे डिजिटल माध्यमातून एकत्र येत आहेत, तेव्हा सध्याच्या सरकारने आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या प्रश्नांचे तातडीने निवारण केले पाहिजे.”
अण्णा हजारे यांच्या या जाहीर इशाऱ्यानंतर आणि सरकारला दिलेल्या सल्ल्यानंतर राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. महाजन म्हणाले, “अण्णा हजारे हे आमचे अत्यंत आदरणीय आणि ज्येष्ठ नेते आहेत. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत आमच्यात आणि त्यांच्यात थेट संवाद होऊ शकलेला नाही. मी लवकरच स्वतः राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची वैयक्तिक भेट घेईन आणि त्यांच्या मनातील सर्व शंका व गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.” परंतु, जेव्हा पत्रकारांनी त्यांना लोकायुक्त कायदा लागू करण्यास होणारा विलंब आणि सोशल मीडियावरील ‘कॉकरोच पार्टी’च्या वाढत्या प्रभावाबाबत थेट प्रश्न विचारले, तेव्हा गिरीश महाजन यांनी त्यावर कोणतेही स्पष्ट उत्तर देण्याचे पूर्णपणे टाळले.
Maharashtra Politics: फडणवीस सरकारची अडचण वाढणार? अण्णा हजारे आमरण उपोषण करणार, कारण काय?
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निमित्ताने अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारची सर्वात दुखती नस असलेल्या ‘लोकायुक्त कायद्या’वर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर होऊन मोठा कालावधी उलटला आहे, तरीही त्याच्या पूर्ण अंमलबजावणी आणि न्यायालयीन अधिकारांच्या फाईल्स प्रशासकीय पातळीवर लाल फितीत अडकलेल्या आहेत. यावरून संताप व्यक्त करत अण्णा हजारे यांनी सरकारला थेट सवाल केला, “या राज्यात स्वतः सरकारने मंजूर केलेला लोकायुक्त कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा मला वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा उपोषण किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे का?”
राजकीय विश्लेषकांच्या मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मिळत असलेला १ कोटींहून अधिक डिजिटल युझर्सचा पाठिंबा अत्यंत सूचक आहे. देशातील सुशिक्षित तरुण वर्ग सध्याच्या प्रशासकीय कारभारावर आणि नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराज असल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याच्या विरोधातून सुरू झालेल्या या डिजिटल आंदोलनाने आता एका मोठ्या सामाजिक-राजकीय चळवळीचे रूप घेतले आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, मंत्री गिरीश महाजन जेव्हा राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंची भेट घेतील, तेव्हा ते लोकायुक्त कायदा लागू करण्याबाबत काही ठोस आश्वासन देतात की हा वाद आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार?
Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?






