केंद्र सरकारला मोठा धक्का! 'कॉकरोच जनता पार्टी'चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
Delhi high Court on CJP: दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचे ट्विटर एक्स खाते पूर्ववत करण्याचे आदेश देत केंद्र सरकारला धक्का दिला आहे. सीजेपीने सोशल मिडीयावर सरकारविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच लाखो फॉलोवर्स वाढले होते. पण केंद्र सरकारने अचानक सीजेपीचे एक्स खाते ब्लॉक करण्याचा आदेश दिला. त्यानंतर हे खाते बंद करण्यात आले.
पण केंद्र सरकारचा आदेश रद्द करत न्यायालयाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अशा निर्बंधांची कायदेशीर आधारावर तपासणी केली पाहिजे, असा निर्वाळा दिला. नीट (NEET) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ब्लॉक करण्यात आलेले कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरील निर्बंध हटवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, नीट पुनर्परीक्षेपूर्वी कोणताही गोंधळ किंवा संभ्रम निर्माण होऊ नये, या उद्देशाने CJP चे X खाते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले होते.
मात्र, याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, नीट परीक्षेसंदर्भातील केंद्र सरकारची प्राथमिक चिंता आता उरलेली नसल्याने खाते ब्लॉक ठेवण्याचे कारणही संपुष्टात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने X खाते ब्लॉक करण्याचा आदेश रद्द करत निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले. यामुळे CJP च्या X खात्यावरील बंदी उठवण्यात आली असून ते खाते पुन्हा कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, नीट-यूजी पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी गेल्या १८ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा मंगळवारी दहावा दिवस होता. उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचे एकूण ६.९ किलोग्रॅम वजन कमी झाले आहे. त्यावरून “सरकारला जाग कधी येणार,?”असा सवाल सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी विचारला आहे.
“कॉकरोच जनता पार्टी” सध्या देशात चर्चेचा विषय बनली आहे. भविष्यात कॉकरोच जनता पार्टी एक राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित होईल की नाही, याबद्दल सतत अटकळ बांधली जात आहे.
मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाने स्पष्ट केले आहे की, सध्या हा एक युवा दबाव गट आहे. या गटाचा रजकीय पक्ष स्थापन होऊ शकतो, पण ऑनलाईन माध्यमातून आमचे लक्ष असल्याचे अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सीजेपीला निवडणूक आयोग कॉकरोच चे निवडणूक चिन्ह म्हणून देईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.






