Gokul Milk Union Election: 'गोकुळ'ची निवडणूक तत्काळ सुरू करा! कोल्हापूर सर्किट बेंचचे राज्य सरकारला आदेश
सुमारे चार महिन्यांपूर्वीच ‘गोकुळ’ दूध संघाने सभासद संस्थांची यादी दुग्ध विभागाकडे सादर केली होती. तसेच संस्थांच्या प्रतिनिधींच्या नावांचे ठरावही जवळपास महिनाभरापूर्वी जमा करण्यात आले होते. पण, त्यानंतरही अद्याप प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न केल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसांच्या आत निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या ९० दिवसांची मुदतही संपत आल्याने कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुंगाव (ता. राधानगरी) येथील स्वामी समर्थ दूध संस्थेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपत असतानाही शासनाने कच्ची मतदार यादी प्रसिद्ध न केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच शासन जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकत असल्याचा आरोपही करण्यात आला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत राज्य शासन आणि दुग्ध विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक कार्यक्रम तातडीने सुरू न केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाऊ शकते,असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीनिवास पटवर्धन आणि अॅड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली, तर राज्य सरकारच्या वतीने अॅड. तेजस कापरे यांनी काम पाहिले.
गेल्या चार महिन्यांपासून गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने सभासद संस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. चौकशी, सुनावण्या आणि प्रशासकीय विलंबामुळे संस्थांचे प्रतिनिधीही त्रस्त झाले आहेत. मात्र, न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर आता निवडणूक प्राधिकरण आणि दुग्ध विभागाची यंत्रणा सक्रिय झाली असून, पुढील प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






