पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांसह पीएमआरडीए हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. पण, सध्या केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनिक आणि मासिक पास दिले जात होते. ग्रामीण भागातील प्रवाशांना पास सुविधा नसल्यामुळे तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. पण, आता सोमवारपासून ग्रामीण भागातील प्रवाशांना दैनिक आणि मासिक पास देण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी ७० रूपयांचा दैनंदिन, तर, १४०० रुपयांचा मासिक पास सुरू केला होता. पण, आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण पुढे करत पीएमपीने १ एप्रिल २०२२ पासून हे दोन्ही पास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या उपनगर आणि ग्रामीण भागातून नोकरी व व्यवसायानिमित्त ये – जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच, आसपासच्या परिसरातून अनेक विद्यार्थीही शिक्षणानिमित्त शहरात येत जात असतात. पास बंद केल्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. नागरिकांकडून पास सुरु करण्याची वारंवार मागणी केली जात होती.
आता सोमवारपासून ग्रामीण भागातील नागरिकांना दैनिक आणि मासिक पास उपलब्ध होणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील पास देखील सुरु राहणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.
…असे खरेदी करा पास !
मासिक पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे नजीकचे पास केंद्रावर जाऊन आधार कार्डची झेरॉक्स प्रत व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकाकडून दैनिक पास घेता येईल.
वाडा रोड व राजगुरूनगर मधील प्रवाशांची मागणी !
पुर्वी पेक्षा आता प्रवाशी भाड्यात वाढ झाली असून प्रत्यक्ष प्रवास सुखकर होण्यापेक्षा अधिक त्रासदायक झाला आहे. पुर्वी राजगुरूनगर ते पुणे सलग प्रवास करता येत असे, परंतु आता राजगुरूनगर ते पुणे प्रवास करताना भोसरी येथे उतरून गाडी बदलावी लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होतो. तसेच मोबाईल चोरी, खिसे कापू, दागिने चोरी या गोष्टींमुळे प्रवाशांना मोठया प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागते.
पास – दैनिक पास – मासिक पास
पुणे महापालिका हद्दीत – ४० – ९००
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत – ४० – ९००
पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत – ५० – १ हजार २००
संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता – १२० – २ हजार ७००