मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय नेतेमंडळींकडून (Political Leaders) आक्षेपार्ह विधाने करून तेढ निर्माण केला जात आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई (Inflation), बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्यांचे प्रश्न या समस्या असतील. या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक, त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन (Financial Budget 2023) होणार आहे. यामध्ये महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत. यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा, अशी मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बागेश्वर बाबा कोण आहे. त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.
आपण लोकशाहीत काम करतो
बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत बोलताना आपण लोकशाहीत काम करतो. आपला भारत खंडप्राय देशात लोकशाहीला फार मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना कायदा दिला आहे. त्या घटना, कायद्यात, संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्या ज्या बाबी असतील, त्या मीडियाने दाखवल्या पाहिजेत. त्या मीडियाने वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत आणि ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
अदानी समूहाने म्हणणे मांडले
हिंडेनबर्ग व अदानीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना यावर देशपातळीवर चर्चा करायला लागले आहेत. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला त्यांचे म्हणणे वाचले. ज्यांच्या विरोधात आले होते त्या अदानी ग्रुपने देखील त्यांचे म्हणणे मांडले आहे हेही बघत आहोत. ज्यावेळी या दोन गोष्टी होत आहेत एक परदेशी कंपनी आणि आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती यामध्ये घडत असताना केंद्र सरकारच्या वित्त विभागाने हस्तक्षेप केला पाहिजे.
महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असेल त्या प्रत्येक नागरिकाला काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना संविधानाने, कायद्याने, घटनेने नियम घालून दिले आहेत. त्याचा भंग आमच्यासह कुणी करु नये असे स्पष्ट मत अजित पवार यांनी किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्या वादावर बोलताना व्यक्त केले.
कसब्याबाबत पुण्यात गेल्यावर चर्चा करणार
प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात काँग्रेसचे नेते आले नव्हते. मात्र, आमची व उध्दव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मी गुरुवार आणि शुक्रवार पुण्यात आहे. त्यावेळी चिंचवडसाठी आतापर्यंत माझ्याकडे नऊ लोकांनी उमेदवारी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागितली आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या व आमच्या वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तीच गोष्ट कसब्याबाबत आहे. काँग्रेस तयारी करत असेल कदाचित पाठीमागील विधानसभा झाल्या. त्यावेळी आघाडीत (त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती) ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली होती. पुण्यात गेल्यावर माझ्या लोकांशी व काँग्रेससह शिवसेना व इतर मित्रपक्षांशी चर्चा करेन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.