कोरेगाव : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठा व वैचारिक बैठक खुंटीला ठेवून आमदारांनी पक्ष बदलू व धोरण बदलू प्रमाणे वागणूक सुरू केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका गावात निवडणुकीच्या तोंडावरच ग्रामपंचायत मेंबरची पळवापळवी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले आहे.
उत्तर कोरगाव येथील एका राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या व पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका गावामध्ये सध्या उपसरपंचाच्या निवडीची चर्चा सुरू होती. सर्व आकडेवारी बेरीज वजाबाकी सर्व व्यवस्थित चालले होते. इतक्यात सायंकाळी निरोप आला. आपल्यातील मेंबर फुटून दुसऱ्या गटांनी पळवल्याची बातमी गावात पसरली आणि गावामध्ये राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले. तीन गटाचे मेंबर फुटल्याने तीन तिघाड काम बिघाड झाल्याचे पहावयास मिळत आहे.
मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदारांची जशी पळवा पळवी झाली. तशा पद्धतीने उत्तर कोरेगावातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या या गावात सदस्याची पळवा पळवी झाल्याने ज्यांनी उपसरपंचासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्याची मात्र झोप उडाली आहे.
पहिल्या गटाची दोरी कापली
अडीच वर्षापूर्वी या गावातील निवडणूक झाली होती. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडी झाल्या होत्या. यामध्ये सरपंचपद आरक्षित असल्याने उपसरपंचपद वाटून देण्याचे ठरले. पण, घोळात घोळ सुरू झाला. त्या मेंबरने पहिल्या गटाची दोरी कापली आहे. तर दुसऱ्या गटाने लगेच गाठ बांधून घेतली. आता मौजमजा करूनच हे महाशय थेट गावात येतील, असा कयास आहे.