कुर्डुवाडी : कुर्डुवाडी नगरपालिकेद्वारा शहराला होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना पोटाच्या, त्वचेच्या, इतर आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
शहराला ज्या उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. ते पावसाअभावी मायनसमध्ये गेले होते. त्यानंतर अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने मागील वर्षी यावेळी १०० टक्के असणारे धरण अवघे १५ टक्के इतकेच आजमितीला आहे. धरणातील पाणी बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजनेतून कुर्डुवाडी येथील जलशुद्धीकरणात पोहचते. तेथे हे पाणी शुद्ध करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र नळाला येणारे पाणी पाहून याचे शुद्धीकरण होते का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता तीन उपसा मोटारीपैकी एकच उपसा मोटार चालू होती. एक कालबाह्य झाल्याचे तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले. दुसरी दुरुस्त करुन स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आली आहे. दोन बेडमध्ये पाणी सोडले जाते. त्यापैकी एक बेड कित्येक महिन्यापासून बंद आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नळ जोडणीची मागणीही वाढत आहेत. शहराला दररोज ४० ते ५० लाख लिटर इतकी पाण्याची आवश्यकता आहे. उजनी धरणातून येणारे पाणी कुर्डुवाडी जलशुद्धीकरणात येते. त्याठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर ७५ एचपीच्या पंपाने हे पाणी उचलून १३.६५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये ते सोडले जाते त्यानंतर शहरात ग्रॅव्हीटीने सोडले जाते. पण सध्या शहराला होत असलेल्या फेसयुक्त दूषित पाण्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अवेळी आणि अस्वच्छ पाणी
शहराला एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तोही वेळी अवेळी आणि अस्वच्छ व दूषित असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात डेंग्यूसारखे आजार उद्भवत आहेत. सध्या बाजारपेठेतील परिस्थिती पाहाता पाण्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्येमुळे दवाखान्याचा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असे झाले आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
जलशुद्धीकरणावरील खर्च कुठे होतो ?
पाण्यात ना ब्लिचिंग पावडरचा वापर असतो, ना गॅसचा. केवळ तुरटी टाकून या पाण्याचा पुरवठा शहराला केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. मध्यंतरी शहरातील काही भागात दुर्गंधीयुक्त, गढूळ, किडे, मासे मिश्रीत पाणीपुरवठा झाला होता. हे पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणावरील होणारा खर्च नेमका कुठे होतो, याचे काडे नागरिकांना पडले आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.
[blockquote content=”शहराला पुरवठा होत असलेल्या पाण्याला फेस येत असून त्याचा रंग व चव बदललेली आहे. त्याचे नमुने घेऊन चाचणी घेण्याची आवश्यकता आहे. ” pic=”” name=”- अजित पुर्वत, नागरिक”]
[blockquote content=”पाण्याला येणारा फेस पूर्णपणे कमी झाला आहे. त्यासाठी पाॅली ऑल्युमिनिअम क्लोराइड वापरले असून योग्य त्या प्रमाणात डोस चालू असून सध्या शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होत आहे.” pic=”” name=”- अतुल शिंदे, पाणीपुरवठा विभाग”]






